Home महाराष्ट्र डोळ्यांत अश्रू अन् मनात वेदना… पवनानगरमध्ये अजितदादा पवारांच्या अश्रुपूर्ण श्रद्धांजली

डोळ्यांत अश्रू अन् मनात वेदना… पवनानगरमध्ये अजितदादा पवारांच्या अश्रुपूर्ण श्रद्धांजली

11
0
पवनानगर : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे आदरणीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे आज पवनानगर येथे अत्यंत भावनिक वातावरणात विधीवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण परिसर शोकसागरात बुडालेला दिसत होता. डोळ्यांत अश्रू, मनात वेदना आणि ओठांवर केवळ “अजितदादा” हेच नाव — अशी अवस्था उपस्थित प्रत्येक कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांची होती.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी मावळ, पवना आणि आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. ज्यांच्या एका हाकेसाठी कार्यकर्ता जीवाचे रान करायचा, अशा लाडक्या लोकनेत्याच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड जनसागर लोटला होता. संपूर्ण परिसरात ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
यावेळी विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. दादांचे कार्य, त्यांची साधी राहणी, कडक शिस्त आणि विकासाची दृष्टी याबद्दल वक्त्यांनी भावना व्यक्त केल्या. “अजितदादा हे केवळ राजकारणी नव्हते, तर सामान्य माणसाचा आधार होते. त्यांच्या एका निर्णयामुळे शेतकरी, कामगार, युवकांचे आयुष्य बदलत होते,” अशा शब्दांत अनेकांनी आपली भावना मांडली.
अजितदादांचे जाणे हे केवळ एका नेत्याचे जाणे नसून, सर्वसामान्य जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांचे बळ आणि नेतृत्व हरपल्याची भावना यावेळी वारंवार व्यक्त करण्यात आली. पवना-मावळ परिसरातील प्रत्येक घर दादांमुळे विकासाच्या प्रवाहात सामील झाले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने संपूर्ण मावळ परिसर पोरका झाला असल्याची हळहळ उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
या शोकसभेला जमलेली अफाट गर्दी म्हणजे अजितदादांनी आयुष्यभर कमावलेल्या माणसांची संख्या आणि जनतेने त्यांच्यावर ठेवलेल्या अढळ विश्वासाची जिवंत साक्ष असल्याचे मत मावळ मतदारसंघाचे आमदार मा. सुनील शेळके यांनी व्यक्त केले. “नेते येतात-जातात, पण अजितदादांसारखी माणसं घडत नाहीत,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली. अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी, जड अंतःकरणाने आणि मनात कायमस्वरूपी कोरलेल्या आठवणींसह नागरिकांनी अजितदादांना अखेरचा निरोप दिला.
Previous articleमुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक बंदीमागचे खरे कारण समोर; प्रॉपेलिन गॅस गळतीमुळे प्रशासनाची तातडीची कारवाई, मोठी दुर्घटना टळली
Next article“मुंबई स्पिरिट की मुंबईकरांची परीक्षा?” – डोंबिवली फास्टसाठी उसळलेली गर्दी, चाकरमान्यांचा संताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here