Home महाराष्ट्र पिंपरी चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शंकर जगताप यांची ‘मॅरेथॉन बैठक’; पाणीटाकी, रस्ते,...

पिंपरी चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शंकर जगताप यांची ‘मॅरेथॉन बैठक’; पाणीटाकी, रस्ते, हॉकर्स झोन आणि ऑटोमोबाइल म्युझियमसह अनेक महत्त्वाचे निर्णय

11
0
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि वाढत्या नागरीकरणाला योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी महापालिका प्रशासनासोबत सविस्तर ‘मॅरेथॉन बैठक’ घेत विविध विकासकामांबाबत ठोस सूचना दिल्या. या बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक सुविधा, हॉकर्स झोन, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन तसेच उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘ऑटोमोबाइल म्युझियम’ उभारणीसारखे अनेक महत्त्वाचे विषय चर्चेत आले.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. सांगवी, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव या वेगाने वाढणाऱ्या भागात सुरळीत, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी २० लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे निर्देश देण्यात आले. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी साठवणुकीची क्षमता वाढवणे अत्यावश्यक असल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले. सांगवी व औंध उरो रुग्णालय परिसरात टाकी उभारल्यास पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच या भागातील इतर आरक्षणे विकसित करून अतिरिक्त पाण्याच्या टाक्यांची उभारणी, पाइपलाइन नेटवर्क सुधारणा आणि तांत्रिक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना वेळेत आणि नियमित पाणी मिळावे यासाठी कालबद्ध नियोजन आखण्यावरही भर देण्यात आला.
शहरातील किवळे, रावेत, मामुर्डी आणि पुनावळा या वेगाने विकसित होणाऱ्या भागांमध्ये आरक्षणे ताब्यात घेऊन रुंद रस्ते, उद्याने, सार्वजनिक शौचालये, क्रीडांगणे, समाजमंदिरे यांसारख्या ‘पब्लिक अमेनिटीज’ विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. वाढत्या लोकसंख्येमुळे मूलभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे आमदारांनी सांगितले.
पथारी व टपरीधारकांच्या प्रश्नांकडेही बैठकीत विशेष लक्ष देण्यात आले. शहरात 17 हजारांहून अधिक नोंदणीकृत फेरीवाले असून त्यांना नियोजित हॉकर्स झोन उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि व्यवसायिकांनाही स्थिर जागा मिळेल, असा मुद्दा आमदार जगताप यांनी मांडला.
उद्योग क्षेत्रातील ओळख अधिक बळकट करण्यासाठी उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानासमोरील मोकळ्या जागेत ‘ऑटोमोबाइल म्युझियम’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही चर्चेत आला. या संग्रहालयात शहरातील प्रमुख औद्योगिक कंपन्यांना आपली दालने उभारण्याची संधी देण्यात येणार असून त्यामुळे शहराची औद्योगिक परंपरा आणि इतिहास जपला जाईल. हा प्रकल्प पर्यटन आणि रोजगार निर्मितीलाही चालना देईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
याशिवाय पिंपळे सौदागर, रावेत आणि थेरगाव परिसरात पोस्ट ऑफिस व पोलीस स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देणे, चिंचवडमध्ये ‘रिलिजियस व्हिलेज’ संकल्पना राबवणे, पिंपळे सौदागर येथे अर्बन व्हिलेज विकसित करणे, सांगवी येथे फुटओव्हर ब्रिज उभारणे तसेच कोकणे चौक पालिका बाजारच्या धर्तीवर विकसित करणे अशा विविध प्रस्तावांवरही सकारात्मक चर्चा झाली.
आमदार शंकर जगताप म्हणाले, “चिंचवड मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत सुविधा उत्तम दर्जात मिळाव्यात, यासाठी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. पाणी, रस्ते, सुरक्षा आणि सार्वजनिक सुविधा या आमच्या प्राधान्यक्रमावर आहेत. आगामी काळात सर्व कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील.” या बैठकीनंतर शहरातील विकासकामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत असून नागरिकांनी या निर्णयांचे स्वागत केले आहे.
Previous articleनंदुरबारकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भरीव मदत : ‘नंदुरबार तालुका विधायक समिती’कडून ₹21 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द
Next articleमुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकरचा भीषण अपघात; आडोशी बोगद्याजवळ गळतीमुळे ‘सेफ्टी हॉल्ट’, वाहतूक पूर्ण ठप्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here