महाराष्ट्राच्या राजकारणात आज नव्या पर्वाची सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एनसीपी) विधिमंडळ पक्षाच्या नेत्या तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला.
या ऐतिहासिक क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील सहकारी, विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते, आमदार व वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शपथविधीनंतर उपस्थितांनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढत, सुनेत्रा पवार यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाल्याने हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरतो आहे.
सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यातील विकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाकडून राज्यातील जनतेला स्थैर्यपूर्ण व विकासाभिमुख कारभाराची अपेक्षा आहे.