मुंबई | मुंबईत सोमवारी आयोजित Subedaar या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेता Anil Kapoor यांनी आपल्या खास विनोदी शैलीत उपस्थितांचे मन जिंकले. शूटिंगचे अनुभव सांगतानाच त्यांनी घरातील गंमतीदार किस्से शेअर केले आणि वातावरण हलकेफुलके केले.
अनिल कपूर म्हणाले की, “मी आजही घरातून बाहेर पडताना माझ्या पत्नीला सांगूनच निघतो. आज ट्रेलर लाँचसाठी जात होतो, तेव्हा सुनीताने विचारले— कुठे चाललात? मी सांगितलं ट्रेलर लाँच आहे. मग तिने पुन्हा विचारलं— कोणत्या चित्रपटाचा आणि कुठे?” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उसळला.
त्यांनी पुढे मिश्कीलपणे सांगितले की, “माझ्या घरी कोणीच माझा फॅन नाही. आजही शूटिंगला जाण्यापूर्वी मला पत्नी Sunita Kapoor यांच्याकडून १० ते १५ हजार रुपये पॉकेट मनी घ्यावी लागते.” त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमादरम्यान अनिल कपूर यांनी ‘धमाल 4’ संदर्भातही हलक्या फुलक्या अंदाजात टोला लगावला. Dhamaal 4 मध्ये नसल्याबाबत विचारले असता त्यांनी हसत उत्तर दिले की, “काही वेळा गोष्टी आपल्या हातात नसतात, पण मी नेहमी पुढच्या संधीची वाट पाहतो.” त्यांच्या या उत्तरातून त्यांनी कोणतीही नाराजी न दाखवता सकारात्मकता व्यक्त केली.
‘सुबेदार’ या चित्रपटात अनिल कपूर एका दमदार आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट झाले आहे. देशभक्ती, कर्तव्य आणि भावनिक नात्यांची सांगड घालणारी कथा प्रेक्षकांना भावेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला. ट्रेलरला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अनिल कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही ते तितक्याच जोमाने काम करत असून, त्यांच्या फिटनेस आणि उर्जेबद्दल चाहत्यांमध्ये विशेष चर्चा असते. ‘सुबेदार’मधील त्यांची भूमिका त्यांच्या अभिनय प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची चर्चा आहे.