Home महाराष्ट्र मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक बंदीमागचे खरे कारण समोर; प्रॉपेलिन गॅस गळतीमुळे प्रशासनाची तातडीची...

मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक बंदीमागचे खरे कारण समोर; प्रॉपेलिन गॅस गळतीमुळे प्रशासनाची तातडीची कारवाई, मोठी दुर्घटना टळली

11
0
मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक अचानक बंद झाल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असले तरी या निर्णयामागे अत्यंत गंभीर सुरक्षेचा मुद्दा असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास प्रॉपेलिन गॅस वाहून नेणारा टँकर महामार्गावर पलटी झाला. टँकर उलटताच त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आणि काही क्षणांतच परिस्थिती धोकादायक बनली.

महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील सुमारे ४० जणांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला गळती रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र टँकरमध्ये असलेले प्रॉपेलिन हे अत्यंत ज्वलनशील आणि स्फोटक रसायन असल्याने अगदी छोटासा स्पार्क किंवा ठिणगीही मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकली असती. त्यामुळे प्रशासनाने कोणताही धोका पत्करू न देता संपूर्ण वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारला तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर बीपीसीएल आणि एनडीआरएफच्या विशेष पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आज पहाटेपासून तज्ज्ञांनी अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने टँकर सुरक्षित करण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत दोन व्हॉल्व्ह बंद करण्यात यश आले असून उर्वरित गॅस सुरक्षित टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिकाम्या टँकरमध्ये गॅस हस्तांतरित करताना प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.
या प्रकारामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक प्रवाशांना तासन्तास अडकून राहावे लागले. एसटी बस सेवा, खासगी वाहतूक आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. मात्र प्रशासनाचे म्हणणे स्पष्ट आहे की, मानवी जीवितापेक्षा कोणतीही सोय मोठी नाही. वाहतूक सुरू ठेवली असती तर छोटीशी निष्काळजीदेखील भीषण स्फोटास कारणीभूत ठरली असती.
काही माध्यमांतून ‘सरकार निष्क्रिय’ असल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न होत असला तरी प्रत्यक्षात घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, बीपीसीएल आणि स्थानिक प्रशासनाने रात्रभर युद्धपातळीवर काम केले. प्रवाशांना पाणी, वैद्यकीय मदत आणि पर्यायी मार्गांची माहिती देण्यात आली. पुणे–मुंबई मिसिंग लिंकसारखे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करून भविष्यात अशा अडचणी कमी करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत एमएसआरडीसीला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आणि भविष्यात अशा रासायनिक वाहतुकीसाठी अधिक कठोर सुरक्षा प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात येणार आहे.
एकंदरीत, हा निर्णय गैरसोयीचा असला तरी प्रशासनाच्या दक्षतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली, हेही तितकेच खरे आहे.
Previous articleॲरॉन जॉर्जचे झंझावाती शतक, भारताची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री; अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा
Next articleडोळ्यांत अश्रू अन् मनात वेदना… पवनानगरमध्ये अजितदादा पवारांच्या अश्रुपूर्ण श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here