Home महाराष्ट्र रेल्वेत खाद्यपदार्थांवर ओव्हरचार्जिंगला लगाम; IRCTC कडून 203 अवैध विक्रेत्यांवर मोठी कारवाई

रेल्वेत खाद्यपदार्थांवर ओव्हरचार्जिंगला लगाम; IRCTC कडून 203 अवैध विक्रेत्यांवर मोठी कारवाई

6
0
मुंबई : मुंबईहून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ व वस्तूंची अवैध विक्री आणि प्रवाशांकडून अधिक दर आकारण्याच्या तक्रारींवरून Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) च्या वेस्टर्न झोनने मोठी कारवाई केली आहे. ३१ जानेवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान २३ दिवस चालविण्यात आलेल्या अचानक तपास मोहिमेत तब्बल २०३ अवैध विक्रेते पकडण्यात आले असून त्यांना संबंधित गाड्यांतून तत्काळ खाली उतरविण्यात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडलेल्या विक्रेत्यांकडे अधिकृत ओळखपत्र नव्हते तसेच ते निर्धारित गणवेशातही नव्हते. नोव्हेंबर २०२५ पासून खासगी कंत्राटदारांच्या सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश आणि आयडी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. तरीदेखील अनेक गाड्यांमध्ये नियमबाह्य पद्धतीने विक्री सुरू असल्याचे तपासात आढळले.
IRCTC ने अधिकृत विक्रेत्यांची ओळख पटवण्यासाठी QR कोड आधारित आयडी कार्ड प्रणाली सुरू केली आहे. या कार्डद्वारे संबंधित विक्रेता अधिकृत आहे की नाही, याची त्वरित पडताळणी करता येते. तपासादरम्यान ज्यांच्याकडे वैध QR आयडी नव्हता, अशा सर्व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, स्नॅक्स आणि जेवणाच्या पदार्थांवर जास्त दर आकारले जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. काही ठिकाणी निर्धारित दरापेक्षा १० ते २० टक्के अधिक पैसे घेतल्याचेही समोर आले. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत होते.
या कारवाईमुळे अधिकृत विक्रेत्यांनाच व्यवसाय करण्याची संधी मिळणार असून, अनधिकृत विक्रीला आळा बसेल. प्रवाशांनी खरेदी करताना विक्रेत्याचे QR कोड आयडी तपासावे तसेच बिल घेण्याची सवय लावावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि पारदर्शक व्हावा यासाठी पुढील काळातही अशा तपास मोहिमा सुरू राहतील, असे IRCTC ने स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; पार्थ पवार राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर
Next article‘टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र’च्या रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here