पुणे/बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास जाणवत असल्याने सकाळी बारामती येथील निवासस्थानी डॉक्टरांच्या पथकाने प्राथमिक तपासणी केली होती. मात्र त्रास वाढल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली विविध तपासण्या सुरू आहेत. डॉ. अभिजित लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या छातीत कफ साचल्याने थोडासा कंजेशन आढळून आला आहे. “त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आवश्यक त्या चाचण्या केल्या जात असून रिपोर्टनुसार पुढील उपचार ठरवले जातील,” असे त्यांनी सांगितले. पुढील दोन ते तीन तासांत सर्व तपासण्यांचे अहवाल मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पवार यांचा दौरा आणि बैठकींचा ताण वाढलेला होता. सतत कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी सुरू असल्याने शारीरिक थकवा जाणवत होता, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यामुळे विश्रांती आणि उपचार दोन्ही आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत रुग्णालयात गर्दी करू नये, असे सांगितले. “साहेबांची प्रकृती स्थिर आहे. हॉस्पिटलमध्ये इतर रुग्ण आहेत, त्यामुळे कोणीही येऊ नये. सर्वांनी शांत राहावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्या प्रकृतीची बातमी समजताच राज्यभरातील राजकीय नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावरही ‘लवकर बरे व्हा’ अशा संदेशांचा वर्षाव होत आहे. राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेतृत्व असल्याने त्यांच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉक्टरांच्या मते, दोन-तीन दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत पवार यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.