Home महाराष्ट्र साश्रू नयनांनी अजितदादांना अखेरचा निरोप; बारामतीत शोकसागर उसळला

साश्रू नयनांनी अजितदादांना अखेरचा निरोप; बारामतीत शोकसागर उसळला

16
0
बारामती | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. ढगाळ आकाश, भारावलेले मन आणि डोळ्यांत साठलेले अश्रू—या दुःखद क्षणांचा साक्षीदार होताना उपस्थित प्रत्येकाचे काळीज गलबलून आले.
परवापर्यंत ज्यांच्यासोबत बैठका, चर्चा, निर्णय आणि पुढील वाटचालीची आखणी सुरू होती, ते अजितदादा आज आपल्यात नाहीत, ही जाणीव स्वीकारणे सर्वांनाच कठीण जात होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगता झंझावात, अविरत कामाचा वेग आणि ठाम निर्णयक्षमता असलेले हे नेतृत्व आज कायमचे शांत झाले आहे. चालतं-फिरतं चैतन्य असलेल्या दादांच्या पार्थिवाचे अत्यंत जड अंतःकरणाने अंत्यदर्शन घेण्यात आले.
दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी अथांग जनसागर उसळला होता. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक—तळागाळातील सर्वसामान्यांपासून ते देशपातळीवरील नेत्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया होती. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांतून उमटणारा आक्रोश, शांतपणे हात जोडून दिलेला निरोप आणि “दादा” म्हणून ओळखले जाणारे प्रेमळ संबोधन—हे सर्व त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांनी जनमानसात कमावलेल्या विश्वासाची खरी पावती ठरले.
या शोकप्रसंगी ज्येष्ठ नेते मा. शरद पवार साहेब, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शाह, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री मा. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह केंद्रीय स्तरावरील मान्यवर, विविध राज्यांतील नेते, राज्य मंत्रिमंडळातील सहकारी, महायुतीतील पक्षांचे नेते, तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजितदादांचे नेतृत्व, प्रशासकीय पकड, विकासाभिमुख दृष्टी आणि निर्णयांची धडाडी—या सर्वांचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणावर कायमचा उमटलेला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी असून, महाराष्ट्राने आज एक कर्तृत्ववान, जनतेशी नाळ जोडलेला नेता गमावला आहे. स्मरणात राहतील ते त्यांचे काम, त्यांची तळमळ आणि जनतेसाठीचा अखंड लढा.
Previous articleलोकभवनात शोकसभा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मिनिटांचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली
Next articleप्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व हरपले; अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here