Home महाराष्ट्र केएल राहुलचा दमदार शतकप्रहार; मुंबई रणजी स्पर्धेबाहेर, कर्नाटक उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

केएल राहुलचा दमदार शतकप्रहार; मुंबई रणजी स्पर्धेबाहेर, कर्नाटक उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

13
0
मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल याने खेळलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर कर्नाटकने रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीत ४२ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या बलाढ्य मुंबई संघाचा पराभव करत मोठा धक्का दिला. शरद पवार अकादमी, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या सामन्यात ३२५ धावांचे आव्हान यशस्वीरीत्या पार करत कर्नाटकने सेमीफायनलमध्ये धडक मारली.
कर्नाटकसमोर मोठे लक्ष्य असताना केएल राहुलने जबाबदारीची खेळी करत १८२ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकारासह १३० धावांची शानदार खेळी साकारली. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २४वे शतक ठरले. राहुलच्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीमुळे कर्नाटकची धावगती कायम राहिली आणि मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव वाढत गेला.
राहुलला स्मरण रविचंद्रननेही भक्कम साथ दिली. त्याने १२३ चेंडूत नाबाद ८३ धावा करत ११ चौकार ठोकले आणि विजयाची मोहर उमटवली. अखेरीस विद्याधर पाटीलने विजयी धाव घेत कर्नाटकचा ऐतिहासिक विजय निश्चित केला. या विजयामुळे कर्नाटकचा आत्मविश्वास उंचावला असून ते १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या उपांत्य फेरीत उत्तराखंडशी दोन हात करणार आहेत.
दरम्यान, दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात जम्मू-काश्मीर संघानेही इतिहास रचला. औकिब नबीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी मध्यप्रदेशचा ५६ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नबीने दोन्ही डावांत मिळून १२ बळी घेत सामन्याचा चेहरामोहरा बदलला. त्याच्या ७/४० आणि ५/७० अशा कामगिरीमुळे मध्यप्रदेशचा डाव कोसळला. मध्यप्रदेशसमोर २९१ धावांचे लक्ष्य होते, मात्र जम्मू-काश्मीरच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांचा डाव २३४ धावांत आटोपला. सारांश जैनने ६४ धावांची झुंजार खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत मोठ्या संघांना धक्का दिला असून यंदाची रणजी ट्रॉफी अधिकच रंगतदार बनली आहे. राहुलच्या शतकाने आणि नबीच्या १२ बळींनी या फेरीतील सामने क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरले आहेत.
Previous articleशरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी हॉलमध्ये उपचार सुरू, डॉक्टरांकडून ‘स्थिर’ असल्याची माहिती
Next article‘रन2फीड’ हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद; 2,500 धावपटूंनी ‘अन्नदान हीच सेवा’चा संदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here