नालासोपारा (पूर्व) : रेजन्सी हॉल येथे केरळ विधानसभा निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित मल्याळी संमेलन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विविध सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मल्याळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात विकास, सुशासन आणि परिवर्तनाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा रंगली.
या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित, माजी आमदार भाई गिरकर, जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, केरळ प्रकोष्ठ प्रमुख उत्तम कुमार, विनोद नायर, विवेक तावडे तसेच सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
केरळ राज्यात विकासाभिमुख धोरणे राबवून रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. परराज्यात राहूनही केरळशी असलेली भावनिक नाळ आणि राज्याच्या प्रगतीत आपला वाटा उचलण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
बैठकीत संघटन बळकटीकरण, मतदारांशी सातत्यपूर्ण संवाद, सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर आणि तरुणांच्या सहभागावर विशेष भर देण्यात आला. केरळमधील आगामी निवडणुकीत विकास आणि सुशासनाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सामूहिक प्रयत्न, शिस्तबद्ध संघटन आणि सकारात्मक विचारसरणी यांच्या जोरावर केरळमध्ये परिवर्तन घडवून आणता येईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. या संमेलनातून एकात्मता, बांधिलकी आणि संघटित शक्तीचा संदेश देण्यात आला.