युद्धाचा परिणाम आता थेट नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांना, 13 मेट्रिक टन द्राक्षांचा कंटेनर परतला पुढे काय?

नाशिक:
Nashik News : जागतिक स्तरावर धुमसणाऱ्या युद्धचा फटका आता थेट नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांना आणि निर्यातदारांना बसू लागला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नाशिकची गोड द्राक्षे परदेशी बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच बंदरांवर अडकून पडली आहेत.
परिस्थिती इतकी गंभीर आहे की, नवी मुंबईतील JNPT बंदरावरून रवानगी झालेले अनेक कंटेनर आता पुन्हा माघारी फिरू लागले आहेत. द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील चित्र सध्या चिंतेचे बनले असून, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली आहे.
नाशिकमधून दुबईसाठी रवाना झालेला द्राक्षांचा एक मोठा कंटेनर युद्धामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे पुन्हा निफाडमध्ये परत आला आहे. निफाड तालुक्यातील सांगळे ऍग्रो प्रोसेस या कोल्ड स्टोरेजमध्ये 13 मेट्रिक टन द्राक्षांनी भरलेला हा कंटेनर सध्या पुन्हा उतरवून ठेवावा लागला आहे.
