जिल्हा प्रशासनातील गुणवत्ता व उत्कृष्टतेचा सन्मान.

मुंबई::मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांकाचे प्रकाशन’ तसेच निर्देशांकात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
महाराष्ट्र राज्य हे आर्थिक दृष्ट्या अधिकाधिक सक्षम होत असून, परकीय गुंतवणूक, उत्पादन क्षेत्र आणि स्टार्टअप परिसंस्था यांसह विविध क्षेत्रांत प्रगतीची नवी उंची गाठत आहे. या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे महाराष्ट्र राज्य, भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनत आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘विकसित महाराष्ट्रा’साठी ठोस रोडमॅप तयार केला आहे. 16 महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये वाढीसाठी सर्वंकष योजना आखण्यात आली आहे. महाराष्ट्राला 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
