Home Uncategorized पुनावळे आणि ताथवडे सब-पोस्ट ऑफिससाठी महापालिकेने कायमस्वरूपी जागा द्यावी; नगरसेवक राहुल कलाटे...

पुनावळे आणि ताथवडे सब-पोस्ट ऑफिससाठी महापालिकेने कायमस्वरूपी जागा द्यावी; नगरसेवक राहुल कलाटे यांची आयुक्तांकडे मागणी

4
0
पिंपरी-चिंचवड : वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील झपाट्याने वाढणारे नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना स्थानिक पातळीवरच टपाल सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पुनावळे आणि ताथवडे येथील मंजूर सब-पोस्ट ऑफिससाठी महापालिकेने कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सप्टेंबर २०२६ मध्ये पत्राद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
भारत सरकारकडून पुनावळे आणि ताथवडे येथे सब-पोस्ट ऑफिस मंजूर करण्यात आले आहेत. पुनावळे पोस्ट ऑफिससाठी ४११०८६, तर ताथवडे पोस्ट ऑफिससाठी ४११०८७ हा स्वतंत्र पिनकोड निश्चित करण्यात आला आहे. तसेच वाकड परिसरासाठी ४११०८८ हा स्वतंत्र पिनकोड देण्यात आला आहे. स्वतंत्र पिनकोड निश्चित झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना स्वतंत्र आणि सुलभ टपाल सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा वाढली आहे.
मात्र, पुनावळे आणि ताथवडे येथील मंजूर सब-पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी आवश्यक जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. ही अडचण दूर करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या उपलब्ध जागांचा विचार करून संबंधित पोस्ट ऑफिस विभागाला अल्पदरात कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कलाटे यांनी केली आहे.
सध्या या परिसरातील नागरिकांना टपाल कार्यालयाशी संबंधित विविध कामांसाठी इतर भागांत जावे लागते. त्यामुळे वेळ आणि प्रवासाचा अतिरिक्त त्रास सहन करावा लागतो. स्थानिक पातळीवर पोस्ट ऑफिस सुरू झाल्यास टपाल पाठवणे, पार्सल सेवा, आर्थिक व्यवहार आणि इतर पोस्ट ऑफिसशी संबंधित सुविधा नागरिकांना जवळच उपलब्ध होऊ शकतील.
वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील वाढती लोकसंख्या, नवीन गृहप्रकल्प आणि विस्तारत असलेली नागरी वस्ती पाहता टपाल सेवांचे जाळे अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे मंजूर पोस्ट ऑफिस लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन पुनावळे आणि ताथवडे येथील पोस्ट ऑफिस कार्यान्वित करण्यासाठी तसेच वाकड परिसरातील टपाल सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले.
Previous articleअमित शाह यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार; अजित पवारांच्या आरोपांचा मुद्दा उपस्थित करत साधला निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here