गडचिरोली : जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोली येथे भव्य जनजातीय गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ झाला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या आदिवासी कलाकारांनी आपल्या पारंपरिक कला, संस्कृती आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या महोत्सवात पारंपरिक लोकनृत्य, लोकगीते, वाद्यसंगीत, हस्तकला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पारंपरिक कलांसोबत आधुनिक डिजिटल कलाविष्कारही आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. आदिवासी समाजाची जीवनशैली, परंपरा, रूढी आणि ऐतिहासिक वारसा जाणून घेण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना मिळत आहे.
केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी गडचिरोलीची निवड होणे ही विशेष अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान देशासमोर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून २०२१ पासून १५ नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अभिनेते भरत गणेशपुरे यांनीही आदिवासी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले. मातृभाषा ही समाजाच्या अस्मितेची आणि ओळखीची महत्त्वपूर्ण खूण असल्याने ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या महोत्सवामुळे आदिवासी कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तसेच आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्यास मदत होत आहे. गडचिरोलीच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख देशभर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.