वॉशिंग्टन (प्रतिनिधी), २ नोव्हेंबर २०२६ : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात शनिवारी फोनवर चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी इराणमधील एक-दोन महत्त्वाच्या ठिकाणांवर अद्याप कारवाई करणे बाकी असल्याचे सांगितले. ही कारवाई अवघ्या काही मिनिटांत करता येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, अमेरिकेकडून ४ नोव्हेंबरपासून इराणवर पुन्हा हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा आखाती देशांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, अमेरिकेने हल्ल्याचा अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले आहे.
पिकॅक्स माउंटन ठिकाणाचा ट्रम्प यांनी केला उल्लेख
ट्रम्प यांनी फ्लोरिडातील मार-ए-लागो येथे पत्रकारांशी बोलताना इराणमधील एक-दोन ठिकाणांवर कारवाई बाकी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ‘पिकॅक्स माउंटन’ या संभाव्य भूमिगत अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणाचाही उल्लेख केला. मात्र, इराण सरकारने या ठिकाणी अण्वस्त्रविषयक कामकाज सुरू असल्याचा दावा नाकारला आहे.
४ नोव्हेंबरला हल्ल्याची शक्यता?
MS NOW च्या वृत्तानुसार, अमेरिकेने आखाती देशांना ४ नोव्हेंबरपासून इराणवर संभाव्य लष्करी कारवाईसाठी तयार राहण्यास सांगितल्याचे तीन वरिष्ठ आखाती अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. ही कारवाई कमी कालावधीची; मात्र तीव्र स्वरूपाची असू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेच्या ३ नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकांनंतर परिस्थिती बदलू शकते, अशी चर्चा आहे. मात्र, ४ नोव्हेंबरचा हल्ला निश्चित झालेला नाही.
इराणकडून प्रत्युत्तराचा इशारा
अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या वृत्तानंतर इराणनेही कठोर भूमिका घेतली आहे. सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी कोणत्याही हल्ल्याला तातडीने आणि व्यापक प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश लष्कराला दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक व्यापक होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राजनैतिक चर्चेचे प्रयत्नही सुरू
एका बाजूला लष्करी हालचालींची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कतारच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी ट्रम्प यांनी नव्या हल्ल्याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले. राजनैतिक मार्गाने तोडगा निघाल्यास अमेरिका त्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काही दिवस मध्यपूर्वेतील परिस्थितीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.