विद्यार्थ्यानी ज्ञानार्जनासोबतच खेळालाही प्राधान्य द्यावे – महापौर रवी लांडगे.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित यशस्वी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा संपन्न
पिंपरी : दिनांक ०१ मे २०२६ : विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळांनाही प्राधान्य द्यावे असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने विविध औद्योगिक कंपन्यांमधून शिका आणि कमवा योजना तसेच अप्रेंटिस योजनेद्वारे ट्रेनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
क्रिकेट सारख्या खेळामुळे टीमवर्क, प्रसंगावधान आणि नेतृत्व गुण वाढीस लागतात असे सांगत, युवाशक्ती बौद्धिकदृष्ट्या सक्षम होत असतानाच शारीरिक दृष्ट्या देखील सक्षम राहणे गरजेचे आहे,त्यासाठी मैदानी खेळांचा खूप मोठा फायदा होतो, त्याशिवाय मैदानी खेळांमध्ये सहभाग घेतल्यामुळे मानसिक आरोग्य देखील चांगले राहते, यासाठी युवा वर्गाने मोबाईल इंटरनेटच्या अतिआहारी न जाता मैदानी खेळांचा वापर करायला हवा असेही महापौर म्हणाले.
या क्रिकेट स्पर्धेत यशस्वी संस्थेतर्फे एल अँड एल प्रोडक्ट कंपनीमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघ विजेता ठरला.विजेत्या संघाला महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करंडक प्रदान करण्यात आला.तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर व मालिकावीर ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला यशस्वी संस्थेच्या ऑपरेशन विभागाचे प्रमुख कृष्णा सावंत,मार्केटिंग विभाग प्रमुख प्रशांत कुलकर्णी, यशस्वी संस्थेचे फिल्ड ऑफिसर, सुपरवायझर व प्रशिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
