Home महाराष्ट्र मुंबईत भारतातील पहिला ‘संगीत रस्ता’ सुरू; किनारी मार्गावर वाहन चालवताना ऐकू येणार...

मुंबईत भारतातील पहिला ‘संगीत रस्ता’ सुरू; किनारी मार्गावर वाहन चालवताना ऐकू येणार ‘जय हो’ची धून

8
0
मुंबई : आधुनिक पायाभूत सुविधांच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या मुंबईने आणखी एक अनोखा आणि देशातील पहिलावहिला प्रयोग साकारला आहे. छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर (Coastal Road) भारतातील पहिला ‘संगीत रस्ता’ अर्थात मेलोडी रोड विकसित करण्यात आला असून, या रस्त्यावरून वाहन जाताच ‘जय हो’ या गाजलेल्या गाण्याची धून ऐकू येणार आहे. या नावीन्यपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने करण्यात आले.
नरिमन पॉईंट ते वरळी या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर, किनारी मार्ग बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर सुमारे ५०० मीटरचा हा विशेष पट्टा तयार करण्यात आला आहे. रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागावर विशिष्ट अंतर आणि खोलीचे ‘रंबल स्ट्रिप्स’ कोरून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. वाहन ६० ते ८० किमी प्रतितास वेगाने या पट्ट्यावरून गेल्यास टायर आणि रस्त्याच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे ध्वनीलहरी तयार होतात आणि त्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘जय हो’ गाण्याची धून वाजवतात.
या रस्त्याच्या आधीच ५०० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटर अंतरावर विशेष सूचना फलक बसवण्यात आले आहेत, जेणेकरून वाहनचालकांना योग्य वेग राखता येईल. त्यामुळे सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. प्रशासनाच्या मते, हा प्रयोग केवळ मनोरंजनासाठी नसून वाहनचालकांनी ठराविक वेग राखावा, यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
जगात अशा प्रकारचे ‘मेलोडी रोड’ फारच मोजक्या देशांमध्ये आहेत. २००७ साली जपानमध्ये प्रथम ही संकल्पना राबवण्यात आली होती. त्यानंतर हंगेरी, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये अशा रस्त्यांची निर्मिती झाली. आता मुंबईने या यादीत स्थान मिळवत भारतातही तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू केला आहे.
पर्यटक आणि मुंबईकरांसाठी हा रस्ता एक वेगळा अनुभव ठरणार असून, किनारी मार्गावरील प्रवास अधिक आनंददायी होणार आहे. शहराच्या स्मार्ट सिटी आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भविष्यात अशा आणखी संगीत रस्त्यांची संकल्पना राबवण्याचाही प्रशासनाचा मानस आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आता केवळ वाहनांचा आवाज नव्हे, तर संगीताची सुरेल लयही ऐकू येणार आहे, हेच या प्रकल्पाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
Previous articleदिल्ली सरकारचा ऐतिहासिक निर्णय; यमुना नदीवर लवकरच क्रूज सेवा सुरू, पर्यटनाला नवे बळ
Next articleपुणेकरांसाठी मोठी बातमी! वर्षातील १५ दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनीक्षेपकांना परवानगी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here