मुंबई/पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडसह भोसरी विधानसभा मतदारसंघातील वाढत्या औद्योगिक व निवासी वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नियम १०५ अंतर्गत भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी शहरातील वीज पुरवठा सक्षमीकरणासंदर्भात लक्षवेधी मांडली. त्यावर मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री Devendra Fadnavis यांनी लेखी उत्तर देत महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्याचे संकेत दिले.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितले की, नवीन प्रस्तावित विकासकामे आणि पायाभूत प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात येईल. वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यातील ताण लक्षात घेऊन वीज यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
सध्याची स्थिती आणि वाढती मागणी
गणेशखिंड शहर मंडळांतर्गत भोसरी, चऱ्होली, मोशी, तळवडे, चिखली आदी भागांमध्ये सध्या औद्योगिक, व्यावसायिक व निवासी मिळून एकूण ४,५३,८२० ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. यामध्ये ५८० उच्चदाब ग्राहकांचा समावेश आहे.
महापारेषणच्या चार २२० के.व्ही. उपकेंद्रांद्वारे —
-
भोसरी आरएस-१ (२७५ एमव्हीए)
-
भोसरी आरएस-२ (१५० एमव्हीए)
-
टेल्को (१५० एमव्हीए)
-
चिंचवड आरएस (२३० एमव्हीए)
अशी एकूण ८०५ एमव्हीए स्थापित क्षमता उपलब्ध आहे, तर सध्याची मागणी ६२७ एमव्हीएपर्यंत पोहोचली आहे. आगामी काळात मागणी वाढणार असल्याने अतिरिक्त पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नव्या उपकेंद्रांना हिरवा कंदील
ऊर्जा विभागाच्या माहितीनुसार पुढील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती दिली जाणार आहे :
-
मोशी येथील सफारी पार्क परिसरात अतिउच्चदाब (EHV) उपकेंद्र
-
चऱ्होली येथे नवीन EHV उपकेंद्र
-
सेंच्युरी इंका EHV उपकेंद्रात दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर
-
मध्यम दाब स्विचिंग स्टेशनसाठी स्वतंत्र प्रस्ताव

