जनगणनेतील प्रत्येक टप्पा अचूक आणि सुलभ पद्धतीने पार पाडा – अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम.
जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक,आणि फील्ड ट्रेनर्स यांना केले मार्गदर्शन
पिंपरी : दि. २४ एप्रिल २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जनगणना मोहिमेअंतर्गत प्रशिक्षण प्रक्रियेला गती मिळाली असून अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात सुरू असलेल्या प्रशिक्षण सत्राला भेट देत मार्गदर्शन केले. त्यांनी प्रशिक्षणाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण कार्यपद्धतीचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार, सहा.आयुक्त किरणकुमार मोरे, चार्ज अधिकारी तथा क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये प्रगणक, पर्यवेक्षक आणि फील्ड ट्रेनर्स यांना दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची सविस्तर माहिती जंगम यांनी घेतली.
प्रशिक्षणाची रचना, विषयांची मांडणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जनगणनेतील प्रत्येक टप्पा अचूक आणि सुलभ पद्धतीने पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक ते कौशल्य देण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेषतः घरगुती सर्वेक्षण, माहिती संकलनातील काटेकोरपणा, नागरिकांशी संवाद कौशल्य आणि डिजिटल साधनांचा वापर या बाबींचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जात असल्याचे त्यांनी पाहिले. ॲप-आधारित डेटा नोंदणी आणि पडताळणी प्रक्रियेमुळे काम अधिक सुलभ आणि पारदर्शक होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार म्हणाले की, प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक प्रगणक व पर्यवेक्षकाला प्रत्यक्ष कामासाठी सक्षम केले जात आहे. अचूक माहिती संकलन आणि वेळेवर डेटा सादर करणे हीच या प्रक्रियेची खरी किल्ली असून त्यासाठी आम्ही सर्व पातळ्यांवर काटेकोर नियोजन केले आहे.
या प्रशिक्षणामुळे प्रगणक व पर्यवेक्षक अधिक सक्षम बनत असून आगामी जनगणनेसाठी आवश्यक तयारी बळकट होत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक लोकसंख्येची माहिती उपलब्ध होण्यास या मोहिमेचा मोठा हातभार लागणार आहे.
जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान होणार असून, त्याअंतर्गत विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत
