गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026’ : परंपरा, वारसा आणि विकासाचा संगम :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

नाशिक :दि. २५ एप्रिल २०२६, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेव जलयात्रा 2026’चा भव्य शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील नद्या एकमेकांशी जोडून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. भविष्यात राज्यात कुठेही दुष्काळ राहणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मल आणि अविरल गोदावरीला प्राधान्य देत त्र्यंबकेश्वरमध्येही गोदावरी बारमाही वाहती राहील, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. त्याच आधारावर पुढील विकास कसा असेल यासंदर्भात या यात्रेची रचना करण्यात आली आहे. देशातल्या उत्तम शासकांमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मंदिर, घाट किंवा बारव यांचे निर्माण करताना किंवा एकंदरीत जलसंधारण या विषयात त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. महिला शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत महिलांना सक्षम करणाऱ्या आणि महिला सैनिकांची तुकडी तयार करण्याचे श्रेयही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाच जाते. कायदा आणि सुव्यवस्था कशी उत्तम राखता येऊ शकते, याचे उदाहरण देखील त्यांच्या काळात पाहायला मिळते असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री छगन भुजबळ, आमदार रविंद्र चव्हाण, प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, आचार्य तुषार भोसले, डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, ह.भ.प. संजयनाना धोंडगे, होळकर घराण्याचे 16 वे वंशज युवराज यशवंतराव होळकर, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते
