LPG News : पश्चिम आशियातील तणावातही भारतात इंधन पुरवठा सुरळीत.

नवी दिल्ली :
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही देशातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे. सरकारकडून इंधन उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून इंधन किंवा गॅसची अनावश्यक खरेदी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सरकारच्या माहितीनुसार, सध्या देशात एलपीजी, पीएनजी आणि सीएनजी (वाहतूक) यांचा 100 टक्के पुरवठा सुरळीत सुरू आहे. कमर्शियल एलपीजीच्या वितरणात रुग्णालये, शैक्षणिक संस्था, औषधनिर्मिती, स्टील, ऑटोमोबाईल आणि कृषी क्षेत्रांना प्राधान्य दिले जात आहे. तसेच प्रवासी मजुरांसाठी 5 किलोच्या लहान सिलेंडरचा पुरवठा दुप्पट करण्यात आला आहे.
पुरवठा संतुलित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना
पुरवठा आणि मागणी यामध्ये संतुलन राखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये रिफायनरी उत्पादन वाढविणे, गॅस बुकिंगचे अंतर शहरांमध्ये 21 दिवसांवरून 25 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवसांपर्यंत वाढविणे यांचा समावेश आहे. तसेच एलपीजीवरील दबाव कमी करण्यासाठी केरोसिन आणि कोळसा यांसारखी पर्यायी इंधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
देशांतर्गत ग्राहकांना प्राधान्य
भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी देशांतर्गत ग्राहकांना प्राधान्य दिले जात आहे. देशात कुठेही गॅस टंचाईची स्थिती नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन गॅस बुकिंगचे प्रमाण 99 टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) च्या माध्यमातून 93 टक्के वितरण केले जात आहे. यामुळे पारदर्शकता वाढून अनियमितता कमी होण्यास मदत होत आहे.
कमर्शियल गॅस विक्रीत वाढ
एप्रिल 2026 महिन्यात आतापर्यंत 1.65 लाख मेट्रिक टनांहून अधिक कमर्शियल एलपीजीची विक्री झाली आहे. 5 किलोच्या लहान सिलेंडरच्या वापरातही वाढ झाली असून, जागरूकता मोहिमेद्वारे नागरिकांना याबाबत माहिती दिली जात आहे.
पीएनजीला चालना – लाखो नवीन कनेक्शन
नैसर्गिक वायू (PNG) वापर वाढवण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली आहेत. मार्च 2026 पासून आतापर्यंत सुमारे 5.52 लाख नवीन पीएनजी कनेक्शन सुरू करण्यात आले आहेत, तर 2.63 लाख अतिरिक्त कनेक्शनसाठी पायाभूत सुविधा तयार करण्यात आली आहे.
याशिवाय, 6.21 लाखांहून अधिक नवीन ग्राहकांनी नोंदणी केली असून, 42,600 हून अधिक लोकांनी पीएनजी स्वीकारल्यानंतर एलपीजी कनेक्शन सरेंडर केले आहे.
अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन
सरकारने नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, पेट्रोल, डिझेल आणि गॅसची साठेबाजी करू नये. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.
एलपीजी ग्राहकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गॅस बुकिंग करावे आणि गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी टाळावी. तसेच पीएनजी, इलेक्ट्रिक आणि इंडक्शन कुकटॉपसारख्या पर्यायी साधनांचा वापर करून ऊर्जा बचतीला प्रोत्साहन द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.
