पुणे : निरोगी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी पुणे शहरात रविवारी सकाळी भव्य राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये सुमारे ४० हजार धावकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच देशाच्या विविध भागांतून आलेल्या धावपटूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटूंची उपस्थितीही या स्पर्धेचे आकर्षण ठरली.
युवकांना व्यसनांपासून दूर ठेवणे, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना अधिक मजबूत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. धावपटूंनी उत्साहाने धाव घेत आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्यामुळे पुणे शहरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध वयोगटांतील नागरिकांनी एकत्र येत फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्याबरोबरच व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय एकता दौड ही केवळ मॅरेथॉन न राहता आरोग्य, एकजूट आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारी चळवळ ठरल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळाले.