मुंबई : शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्त आणि पर्यटकांसाठी आता जागतिक दर्जाच्या निवास व आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (MADC) आणि ताज ग्रुपचा भाग असलेल्या द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे या कराराची स्वाक्षरी व देवाणघेवाण करण्यात आली.
या प्रकल्पांतर्गत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील ३.७ एकर भूखंडावर पंचतारांकित श्रेणीतील हॉटेल विकसित करण्यात येणार आहे. या हॉटेलची वास्तुरचना आणि अंतर्गत सजावट करताना शिर्डीची स्थानिक कला, संस्कृती आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे आधुनिक सुविधांसोबतच शिर्डीच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंबही हॉटेलमध्ये पाहायला मिळणार आहे.
शिर्डी हे देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे वर्षभर साईदर्शनासाठी भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारल्यामुळे प्रवाशांना दर्जेदार निवास, आदरातिथ्य आणि आरामदायी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः विमानाने शिर्डीत येणाऱ्या पर्यटकांसाठी हा प्रकल्प सोयीचा ठरण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पामुळे केवळ पर्यटन सुविधांमध्येच वाढ होणार नाही, तर हॉटेल व्यवस्थापन, आदरातिथ्य आणि पर्यटनाशी संबंधित विविध क्षेत्रांत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासही प्रोत्साहन मिळणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
या प्रसंगी मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, MADC चे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि IHCL च्या कार्यकारी उपाध्यक्ष सुमा वेंकटेश उपस्थित होत्या.