मुंबई : ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्या मुंबई दौऱ्यात क्रिकेटचा अनोखा रंग पाहायला मिळाला. मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथे क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत शाही दाम्पत्याने खास वेळ घालवला. यावेळी पारंपरिक कुल्हडमधील चहाचा आस्वाद घेत त्यांनी भारतीय संस्कृतीची झलक अनुभवली. तसेच शालेय विद्यार्थ्यांसोबत गल्ली क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला.
या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. व्हिडिओमध्ये प्रिन्स विल्यम विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहेत. सचिन तेंडुलकर त्यांना क्रिकेटमधील काही बारकावे समजावून सांगत मार्गदर्शन करताना दिसतात. तर केट मिडलटन मैदानाच्या कडेला उभ्या राहून हसतमुखाने या खेळाचा आनंद घेताना दिसल्या.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांनाही क्रिकेटच्या दिग्गज खेळाडूसोबत आणि ब्रिटिश राजघराण्यातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची अनोखी संधी मिळाली. खेळाच्या माध्यमातून संवाद, आनंद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे सुंदर चित्र यावेळी पाहायला मिळाले.
यापूर्वी शाही दाम्पत्याने भारताच्या पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल आणि अर्थशॉट प्राइज कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. मुंबईतील सचिन तेंडुलकर यांच्यासोबतची ही भेट त्यांच्या भारत दौऱ्यातील विशेष आकर्षण ठरली आहे.