मुंबई : राज्यात सध्या हवामानाचा संमिश्र अनुभव नागरिकांना येत आहे. दुपारच्या वेळेत कडक ऊन आणि वाढत्या तापमानामुळे उकाडा जाणवत असताना सकाळी व रात्री मात्र थंडीचा अनुभव येत आहे. त्यामुळे एकाच दिवसात उन्हाळा आणि हिवाळा अशा दोन्ही ऋतूंची जाणीव नागरिकांना होत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. दुसरीकडे, धुळे येथे किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पहाटे आणि रात्री थंडीचा जोर अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत हवामान उष्ण व कोरडे राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात सकाळच्या वेळी गारवा वाढू शकतो. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर विशेष परिणाम होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज आहे. तापमानातील या चढ-उतारामुळे नागरिकांनी दुपारच्या उन्हापासून बचाव करावा तसेच सकाळी आणि रात्री थंडीपासून काळजी घ्यावी.