पिंपरी चिंचवड पालिकेत 52 कोटीच्या बिलांचा घोटाळा.

पिंपरी: दि. ११एप्रिल २०२६, बोगस उपसूचनांच्या आधारे तब्बल 52 कोटी रुपयांची देयके (बिले) काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला आहे.आर्थिक वर्षाच्या अखेरीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही सर्व देयके तातडीने रोखली आहेत. याप्रकरणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून,आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 52 कोटी रुपयांचा देयक घोटाळा प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, 30 मार्च आणि 31 मार्च रोजी मुख्य लेखा आणि वित्त विभागाने तब्बल 52 कोटी रुपयांची बिले वर्ग करण्याची प्रक्रिया केली होती. विशेष म्हणजे या बिलांना स्थायी समिती किंवा महासभेची कोणतीही अधिकृत मंजुरी नव्हती. केवळ बोगस उपसूचनांचा आधार घेऊन ही रक्कम कंत्राटदारांच्या खात्यावर वळवण्याचे नियोजन होते. पण हा संशयास्पद प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने बँकेला आदेश देऊन ही रक्कम जमा होण्यापासून रोखली.
दरम्यान प्रवीण जैन यांच्या पदाचा कार्यभार मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले यांच्यावर सोपवण्यात आला आहे. प्रशासकीय कामकाजात कोणत्याही अडथळा येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. प्रमोद भोसले यांच्याकडून वित्त विभागाचे काम सुरळीतपणे पार पाडले जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणामुळे पालिकेच्या आर्थिक व्यवहार व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रशासनाच्या पारदर्शकतेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. चौकशी समितीमार्फत संबंधित कागदपत्रांची तपासणी व अधिकार्यांचे जबाब घेतले जाणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार तज्ञांची मदत घेऊन आर्थिक व्यवहाराची सखोल तपासणी केली जाणार आहे
