प्रताप सरनाईकांची विधानसभेत घोषणा२०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस होणार इलेक्ट्रिक;

मुंबई : येत्या २०३५ पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व १४ हजार बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली.
सभागृहात नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना सरनाईक यांनी या धोरणाची सविस्तर माहिती दिली.वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या दरातील अस्थिरता पाहता, ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला हरित ऊर्जेची जोड देणे ही काळाची गरज आहे.
या निर्णयामुळे केवळ पर्यावरणाचे रक्षण होणार नाही, तर इंधन आणि देखभाल खर्चात बचत होऊन एसटीची आर्थिक स्थितीही सुधारेल. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना विशेष कर सवलती आणि टोल माफी देण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर दर २५ किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील. ही चार्जिंग स्टेशन्स सौर ऊर्जेवर चालवण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
