महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या असामयिक निधनाचे वृत्त राज्यासाठी अत्यंत दुःखद, वेदनादायक आणि स्तब्ध करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथील महाराष्ट्र लोकभवनात आयोजित शोकसभेत दिवंगत अजित पवार यांना तसेच विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतर सर्व व्यक्तींना दोन मिनिटांचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या शोकसभेत उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी अत्यंत गंभीर आणि भावनिक वातावरणात आपली श्रद्धा व्यक्त केली. अजित पवार हे केवळ एक प्रभावी राजकीय नेते नव्हते, तर जनतेशी थेट नातं जपणारे, संवेदनशील आणि कार्यक्षम जननेते म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रशासनातील शिस्तीसाठी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले.
राज्याच्या राजकारणात ठाम भूमिका, निर्णयक्षम नेतृत्व आणि कामाचा धडाका ही त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती भरून निघणे कठीण असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी विमान अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबीयांप्रती शोकसभेत गहिर्या संवेदना व्यक्त करण्यात आल्या. तसेच, ईश्वराकडे दिवंगत आत्म्यांना सद्गती लाभो आणि शोकाकुल कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना व समर्थकांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती व धैर्य मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली.
आजची ही शोकसभा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासातील एक अत्यंत भावनिक क्षण ठरली.