महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. चाकणकर यांनी आपल्या नावासह छायाचित्र, व्हिडिओ, वैयक्तिक ओळख आणि साडी नेसण्याची विशिष्ट शैली यांचे ट्रेडमार्क नोंदणी केल्याचा दावा केला आहे.
आपल्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीने व्यावसायिक कारणांसाठी आपल्या नावाचा, फोटोचा, व्हिडिओचा किंवा वैयक्तिक शैलीचा वापर करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अशा प्रकारचा वापर झाल्यास संबंधितांविरोधात दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिल्याचे समोर आले आहे.
स्वयंघोषित अशोक खरात याच्यावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हा मुद्दा चर्चेत आला आहे. चाकणकर यांच्या या भूमिकेवर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही महिला नेत्यांनी आक्षेप घेत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे व्यक्तीची ओळख, वैयक्तिक शैलीवरील हक्क आणि ट्रेडमार्क नोंदणी यावरून राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.